Thursday, May 13, 2021

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज

CLICK HERE FOR QUIZ ON "CHHATRAPTI SAMBHAJI MAHARAJ" छत्रपती संभाजी महाराज प्रश्न मंजूषा के लिए यहाँ क्लिक करें

 

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज जयंती आहे. छत्रपती संभाजी महाराजांची संपूर्ण कारकीर्द तेजोमय होती. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन संपूर्ण हिंदुस्थानाला तोंडात बोटे घालायला लावणारा प्रचंड पराक्रम संभाजी महारांजी केला. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर किंवा त्यानंतरही अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. कोणत्याही मोहिमेत त्यांना कधीच अपयश आले नाही. छत्रपती संभाजी महाराजांना टक्कर देईल, असा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. संभाजी राजे हे असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात अशा आहेत. जाणून घेऊया...

संभाजी राजेंचे बालपण

संभाजी राजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना पुत्ररत्न झाले. शिवाजी महाराजांचे संभाजी राजेंवर अपार प्रेम होते. नशीबाचे दशावतार संभाजी महाराजांनी अगदी लहानपणापासूनच भोगले. संभाजी राजे दोन वर्षांचे असताना सईबाईंचे अकाली निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाऊंनी केली. केशवभट आणि उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई यांनीही त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते. लहान असल्यापासूनच संभाजी महाराजांनी राजकारणातील डावपेच, गनिमी कावा अगदी भराभर आत्मसाद केले.

नवव्या वर्षी आग्रा मोहीम

छत्रपती शिवाजी महाराज आग्रा मोहिमेवर गेले असताना त्यांनी संभाजी राजेंनाही सोबत घेतले होते. त्यावेळी संभाजी राजे अवघ्या नऊ वर्षांचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्यांनी संभाजी महाराजांना मथुरेत ठेवले होते. संभाजी राजेंवर सुरक्षित स्वराज्यात आणण्यासाठी संभाजी राजेंचे निधन झाल्याची अफवा महाराजांनी पसरवून दिली. त्यानंतर २० नोव्हेंबर १६६६ रोजी अगदी सुखरूपपणे ते पुन्हा राजगडास पोहोचले. आग्र्याहून रायगडावर पुन्हा परत येताना संभाजी राजेंनी केलेल्या बुद्धिचातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत.

चौदाव्या वर्षी बुधभूषण

छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लगार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर 'समयनय' हा ग्रंथ संभाजी राजेंनी लिहून घेतला. 'धर्म कल्पलता' हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो.

कुशल संघटक

छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. ते कुशल संघटक होते. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे पुढे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, पंत सुमंत म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, पंत सचिव म्हणून आबाजी सोनदेव, पंत अमात्य म्हणून दत्ताजी पंत, पंत अमात्य म्हणून अण्णाजी दत्तो यांची नियुक्ती करण्यात आली होती. 'श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि ||', अशी छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांची मुद्रा होती.

अजिंक्य संभाजी राजे

छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या पराक्रमाच्याजोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्या विस्तार आणि बचाव केला. मराठा साम्राज्याच्या १५ पट असणाऱ्या मुघल साम्राज्याशी संभाजी महाराजांनी एकहाती लढा दिला. संभाजी महाराजांनी गनिमी कावा पुरेपूर वापरत औरंगजेबाला पुरते जेरीस आणले होते. संभाजी राजेंनी आपल्या कार्यकाळात एकूण १२० युद्धे लढली. महत्वाचे म्हणजे संभाजी महाराजांना १२० पैकी एकही लढाईत अपयश आले नाही. असा पराक्रम करणारे छत्रपती संभाजी महाराज हे एकमेव योद्धा होते. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता.

बुऱ्हाणपूर आणि रामशेज

छत्रपती शिवरायांनंतर शंभूराजे छत्रपती झाले. संभाजी महाराजांनी सरसेनापती म्हणून हंबीरराव मोहिते यांची नियुक्ती केली. सरनौबत हंबीरराव मोहिते यांनी अचानक बुऱ्हाणपूरवर हल्ला केला. मोठ्या फौजफाट्यासह मराठी सैन्य ७० मैलाची मजल मारून एकाएकी बुऱ्हाणपुरावर चालून गेले. तीन दिवसापर्यंत मराठे लुट करत होते. जडजवाहीर, सोने-नाणे, रत्ने आणि मौल्यवान सामान घेतले. इतर जिन्नसाकडे त्यांनी लक्षही दिले नाही. भांडीकुंडी, काचेचे सामान, धान्य, मसाले, वापरलेली वस्त्रे आदी सर्व लूट वाहून नेणे शक्य नसल्यामुळे तेथेच टाकून मराठ्यांचे सैन्य निघून गेले. संभाजी महाराजांच्या दराऱ्यामुळे पुढील काही महिने त्या वस्तूला हात लावायची कुणाची हिंमत झाली नाही, अशी आख्यायिका आहे. शहाबुद्दीन फिरोजजंगने रामशेज किल्ल्यावर चाल करून गेला. हा किल्ला सहज हस्तगत करता येईल, अशी मोघलांचा समज होता. मात्र, संभाजी महाराजांनी या किल्ल्यावर रसद पोहोचवण्यासाठी खास तुकडी तैनात केली. मराठ्यांनी कडवी झुंज देत हा किल्ला ५ वर्षे झुंजवत ठेवला होता.

उदार धार्मिक लोकनीति

छत्रपती शिवाजी महाराजांचे धार्मिक धोरण संभाजी राजेंनी पुढे चालू ठेवले. अनेक देवस्थाने, मठ, सत्पुरूष यांना वार्षिक नेमणुका पूर्ववत करून दिल्या. संभाजी महाराजांनी संत तुकारामांचा मुलगा महादोबा यास वर्षासन दिले. तसेच मौनी गोसावी, गणीराम, वासुदेव गोसावी, कऱ्हाडचे वेदशास्त्री नरसीभट शेषभट मुंज्येमणी, कांदळगावचे अनंत भट, महादेव भट, महाबळेश्वरचे वेदमूर्ती राम भट, कऱ्हाडचेच शिवभट नीलकंठभट अग्निहोत्री, पावसचे हरिभट पटवर्धन, रामचंद्र केशवभट पंडित, निंब येथील सदानंद मठाचे अनंतगिरी गोसावी यांना सढळ हस्ते मदत केली. त्यांच्या व्यवस्था लावल्या. संभाजीराजांनी चिंचवड, मोरगाव, सज्जनगड, चाफळ, शिंगणवाडी, महाबळेश्वर इ. देवस्थानांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने चालावे, यासाठी पूर्वीची वृत्ती, इनामे व सनदा पूर्ववत केल्या. एकूण धार्मिक कारभाराकडे ते जातीने लक्ष घालत असत, हे तत्कालीन पत्रव्यवहारांतून दिसते.

हौतात्म्यामुळे अजरामर झालेले पराक्रमी पुरूष

१६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.

CLICK HERE FOR QUIZ ON "CHHATRAPTI SAMBHAJI MAHARAJ" छत्रपती संभाजी महाराज प्रश्न मंजूषा के लिए यहाँ क्लिक करें

No comments:

Post a Comment

CCS (CCA) Rules - The Schedule

CCS (CCA) Rules - The Schedule THE CENTRAL CIVIL SERVICES (Classification, C...

PROMISEDPAGE

Quiz on "AZAD HIND FAUJ" UPLOADED. TYR IT.

BEST OF LUCK

"HAVE A NICE DAY "